वृत्तवाहिन्यांचे भान सुटले | आगळं! वेगळं !!!

वृत्तवाहिन्यांचे भान सुटले

अलीकडे टीआरपी वाढविण्याच्या हव्यासापोटी विविध वृत्तवाहिन्या आपले तारतम्य सोडून बातम्या दाखवत आहेत असे दिसते. आणि विशेषतः जेव्हा कधी मुंबईवर अतिरेकी हल्ले किंवा बॉम्बस्फोट होतात तेव्हा ही बाब प्रकर्षाने जाणवते. या नादात वृत्तवाहिन्या आपणच 'गुप्तचर' असल्याच्या अविर्भावात, (जेव्हा की तपासयंत्रणा अजून घटनास्थळावरून सॅम्पल गोळा करत होत्या, त्यानंतर त्यांची तपासणी होऊन त्याचे निष्कर्ष जाहीर होणार त्याआधीच) स्फोटके कोणती वापरली गेली, या बॉम्बस्फोटामागे कोणत्या संघटनेचा हात आहे हे फक्त आपल्यालाच 'कळले' अशा थाटात बातम्या दाखवताना दिसत होत्या.



मात्र टीआरपी वाढविण्यासाठी दाखविल्या जाणारी बातमी जर लोकांच्या जीविताला आणि मालमत्तेला हानी पोहोचवू शकणारी ठरणार असेल तर, मात्र ही बाब अतिशय गंभीर आहे. आता कालचे हेच उदाहरण बघा ना. ऑपेरा हाउस येथे झालेल्या बॉम्बस्फोटासंदर्भात, हिरे व्यापाऱ्यांचे कोट्यावधी रुपये किंमतीचे हिरे चोरीला गेले असण्याची 'शक्यता' या नावाखाली जी बातमी एका वृत्तवाहिनीवर दाखविण्यात आली. ते पाहून या वाहिन्यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय रहाणार नाही.

या बातमीत चक्क हे हिरे व्यापारी अतिशय मौल्यवान अश्या हिऱ्यांचे पाकीट सुरक्षिततेसाठी अंगावरील कपड्याच्या आत कसे लपवून बाळगतात याचे चित्रीकरण दाखविण्यात आले. म्हणजे अश्या व्यापाऱ्यांच्या जीविताची, आणि त्यांच्या व्यवसायाचा अविभाज्य भाग असणाऱ्या किंमती ऐवजाच्या सुरक्षेबद्दल गुप्तता पाळायची सोडून, ज्यांना कुणाला या सुरक्षेची माहिती नाही अशा सर्वांना आणि विशेषतः डाकू, चोर, लुटेरे मंडळीना या वृत्तवाहिनीने ही माहिती देऊन एकप्रकारे 'प्रशिक्षित' केले आणि या व्यापाऱ्यावर हल्ले करून लुटमार करण्यासाठी 'आमंत्रित'च केले असे म्हणावे लागेल.

ही बातमी म्हणजे चोरांना आमंत्रण आणि हिरे व्यापाऱ्यांच्या जीवाला धोका ठरू शकते, हे कॅमेरामन, रिपोर्टर, न्यूज एडीटर यापैकी कुणाचाही लक्षात आले नाही का? आणि दुर्दैवाने असे प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण? या वृत्तवाहिन्यांना 'आवरणारे' कुणी आहे की नाही? आणि 'ट्रेड सिक्रेट' बाबत सदैव सतर्क असणाऱ्या व्यापाऱ्यांची 'अक्कलहुशारी' ही माहिती वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला सांगताना कोठे गेली होती? याला व्यापारीही तितकेच जबाबदार आहेत.

अश्याच प्रकारे २६/११ च्या ताज हॉटेलवर झालेल्या हल्ल्याचे 'लाइव्ह टेलिकास्ट' दाखविल्यामुळे, पाकिस्तानात बसलेल्या 'आकांना' तेथे आरामात बसून ताजमधील हल्ला करत असलेल्या अतिरेक्यांना व्यवस्थितपणे सूचना देता येण्याची 'सोय' याच वृत्तवाहिन्यांच्या मूर्खपणामुळे झाली होती, याची आठवण येथे झाल्याशिवाय रहात नाही. त्यामुळे आपण दाखवत असलेल्या चित्रीकरणाचे कुणावर काय परिणाम होतील याचा विचार करून, वृत्तवाहिन्यांनी बातम्या दाखविताना 'तारतम्य' बाळगणे आवश्यक आहे.

2 Comments:

  1. या वर एक उपाय - कुठ्लेहि न्युज चॅनेल १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ बघु नये

    ReplyDelete
  2. योगेशभाई,
    बिलकुलच न बघणं तर त्याहूनही उत्तम उपाय ठरेल नाही का? कारण आपण म्हणता त्या दहा मिनिट बघण्याच्या वेळेतच जर असं काही पहायला मिळालं तर...?

    ReplyDelete