May 2014 | आगळं! वेगळं !!!

पक्षनिष्ठ की सत्तानिष्ठ

पक्षनिष्ठ की सत्तानिष्ठ

सोळाव्या लोकसभेसाठी 2014 ची सार्वत्रिक निवडणूक एकदाची पार पडली. ही निवडणूक बऱ्याच कारणांनी सर्वांच्या लक्षात रहाणारी ठरली आहे.
निवडणूकीचा हा अंक संपला, आणि आता सुरू झाला आहे, तो आत्मपरिक्षणाचा आणि चिंतनाचा अंक. या अंकातील प्रसंग चांगलेच मनोरंजक होणार होतील. पराभवाचे खापर फोडण्यासाठी डोकी शोधली जातील. याच निमित्ताने आपल्या वैयक्तिक हेवेदाव्यांचा हिशोब चुकता करण्यासाठी एकमेकांवर आरोप केले जातील. राजीनाम्याच्या मागण्यांना जोर येईल. यांना हटवा, पक्ष वाचवा अशी नारेबाजी होईल. अशी नारेबाजी तर मतमोजणीच्या दिवशीच देशाच्या राजधानीत पहायला मिळाली सुध्दा. यातूनही भाटगिरी, चापलूसी, चमचेगिरी करणारे लाळघोटे तथाकथित पक्षनिष्ठ आपण पक्षाशी नव्हे तर, पक्षश्रेष्ठींशी किती एकनिष्ठ आहोत हे दाखविण्याचा अटोकाट प्रयत्न करतील.
आता खरा प्रश्न आहे तो त्या पक्षनिष्ठांचा, की ज्यांना सत्तेशिवाय जगण्याची सवय नाही. जसे जलबिन मछली तसे सत्तेशिवाय तडफडणारे हे पक्षनिष्ठ, सत्तेच्या प्रवाहापासून दूर फेकल्या गेलेल्या पक्षात राहून आपली पक्षनिष्ठा सिध्द करतील की, सत्तेत आलेल्या पक्षात प्रवेश करुन आपली निष्ठा सत्तेवरच आहे हे दाखवून देतील, हे आता येणारा काळच ठरवेल.

* * *