March 2020 | आगळं! वेगळं !!!

कोरोना : प्रत्येकाचे टेन्शन वेगळे




आज सकाळी सकाळीच सुरेशचा व्हिडिओ कॉल आला. मी विचारात पडलो, की बुवा याने आज सकाळी सकाळीच व्हिडिओ कॉल कसा काय केला?
बोला सुरेश शेठ, आज सकाळी सकाळीच व्हिडिओ कॉल? काय विशेष?
गरीबी फार वाईट असतेनिराशेने आडवी मान हलवीत सुस्कारा सोडत तो म्हणाला.
का रे काय झालं? कुणाबद्दल बोलतोय तू? त्याचं हे रुप मला नविनच होतं.
आता मी अजून दुसऱ्या कुणाबद्दल बोलणार? माझ्याबद्दलच बोलतोय.
काय सुरेश शेठ, आज कुणी भेटलं नाही का? गरिबी कशाला म्हणतात ते तरी माहिती आहे का?
करा चेष्टा, इथं मी काय दुःखात आहे, ते राहिलं बाजूलाच आणि... जाऊ द्या गरिबांची थट्टा करायची जगाची रितच आहे म्हणा. पुन्हा सुस्कारा सोडत सुरेशच्या तोंडातून निराश सूर बाहेर पडले.
हे बघ सुरेश, थट्टाबिट्टा काही नाही, तुला काय म्हणायचयं ते मला नाही समजलं. जरा स्पष्ट बोलशील का? असं कोड्यात बोलू नको गड्या.
आता तुझ्यापासून काय लपवायचयं? तुला सगळं सविस्तरच सांगावं लागेल.
तेच म्हणतोय मी काय झालं ते स्पष्ट सांग.
सांगतो सांगतो ऐक नीट. या कोरोनामुळे बाजारपेठा बंद होतील याची कुणकुण मला आधीच लागली होती. पण खात्री वाटत नव्हती, तरीही मी रविवारी अडचण येऊ नये म्हणून एक आधीच आणून ठेवली होती.
काय आणून ठेवली होती?
अरे तुला तर माहित आहेच ना, मी फक्त रविवरीच एक क्वॉर्टर घेतो ते. त्यामुळे मी माझी एक क्वॉर्टर आधीच घरी आणून ठेवली होती.
सुऱ्या चक्क तू घरी आणून ठेवली? आणि वहिनी कसं काय काही बोलल्या नाहीत तुला?
बोलली रे, पण मी तिला समजावलं, मी या आधी कधी घरी आणलीय का? मी कधी घरी घेतो का? फक्त एवढ्या बंदमुळेच आणलीय. मग मात्र त्यावर ती काही बोलली नाही.
मग थोडासा पॉज घेऊन सुरेश पुढे बोलू लागला, मोदीजींनी २२ तारखेला रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत जनता कर्फ्यू जाहिर केला. मग मी विचार केला म्हटलं ठीक आहे, रात्री ९ नंतर दर रविवारप्रमाणे बाहेरच जाता येईल, घरी घ्यायला नकोच. आणि जी एक आणून ठेवलेली आहे,  ती पडेना का तशीच.
मग अडचण कुठे आली? मी त्याला विचारले.
अरे काय सांगू तुला, अचानक ३१ मार्च पर्यंत बाजारपेठा बंद करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश शुक्रवारी संध्याकाळी मला व्हॉटसअपवर वाचायला मिळाला. तसे मी कॅलेंडर बघितले आणि आपण एकच क्वॉर्टर आणून चूक केली असे वाटायला लागले. म्हणून मग आणखी एक क्वॉर्टर २९ तारखेच्या रविवारसाठी मी आणून ठेवली.
भागलं की मग तुझं तर लेका, तुझा कोटा तर कंप्लेट.
कशाचा कोटा कंप्लेट बाबा? २२ तारखेला रात्री ९ वाजता संपणारा जनता कर्फ्यू सोमवारी पहाटे पाचपर्यंत वाढविल्याचे समजले. म्हणून मग कर्फ्यू संपल्यावर बाहेर जाण्याचा केलेला प्लॅन  मी कॅन्सल करुन त्या रविवारी पहिली आणून ठेवलेली एक क्वार्टर संपवून टाकली.
मग अजून एक शिल्लक आहेच की तुझ्याकडे.
अरे बाबा एक शिल्लक आहे हीच तर खरी ट्रॅजेडी आहे.
एक शिल्लक आहे हीच ट्रॅजेडी? मी नाही समजलो.
अरे पंतप्रधानांनी २४ तारखेच्या मध्यरात्रीपासून २१ दिवसांसाठी संपूर्ण देशच लॉक डाऊन केल्याची घोषणा केली. आणि ही घोषणा होण्यापूर्वीच दोनपैकी एक क्वॉर्टर तर मी आधीच संपवली होती. आणि आता लॉक डाऊनमुळे कुठे मिळणंही मुश्कील आहे. आता जी एक शिल्लक आहे, त्यात मला पुढचे तीन रविवार कसे भागवायचे हा प्रश्न पडलाय. शेवटी सुरेशने त्याचा खरा प्रॉब्लेम क्लिअर केला.
हात्तीच्या एवढचं ना? दर रविवारी सिक्स्टिचा एक पेग प्रमाणे तीन रविवारमध्ये राहिलेली एक क्वॉर्टर संपवून टाक.  कशाला टेन्शन घेतोस? मी माझे गणितीय ज्ञान सार्थकी लाऊन त्याला सल्ला दिला.
अरे तुला इथे गंमत सुचायला लागलीय? पण २१ दिवसानंतर जर हे लॉक डाऊन संपलं नाही तर अजून किती दिवस मला आहे त्या एक क्वॉर्टरमध्ये  काढावे लागतील? पोलिओ डोसप्रमाणे एक एक ड्रॉप जिभेवर टाकून रविवार काढण्याच्या कल्पनेनेच माझं टेन्शन वाढायला लागलयं. आणि तुला मस्करी सुचायला लागलीयं.  जाऊ दे मी तुला फोन केला तेच चुकलं ठेवतो फोन मी.
आणि मी पुढे काही बोलायच्या आतच आमच्या चिंताग्रस्त मित्राने फोन कट केला सुध्दा.
l l l