आगळं! वेगळं !!!

बात हजम नहीं हुई
बात हजम नहीं हुई

पंचतारांकित भोजन

फक्त दोघांनाच रुचले

बात हजम न झाल्याने

महायुतीला नाही पचले'महा'राज युती'महा'राज युती

लोकसभेचे रण सोडा
मोदींना दिल्लीत धाडा
'महा'राज युती साठी
उघडा आहे आमचा वाडा

नाराज अजूनी
नाराज अजूनी

सदाभाऊंनी माढा गटवले, 
जानकरांना बारामतीत पाठवले,
महायुतीने प्रकरण मिटवले, 
पण नाराज अजूनी आठवले

प्रत्येकांचं दिसतयं
प्रत्येकांच दिसतयं

आपलं ठेवावं झाकून
दुसऱ्यांच बघावं वाकून
जनता हसतेय आता
प्रत्येकांच दिसतयं ते बघून

संपला वनवाससंपला वनवास

चौदा वर्षाचा वनवास
बारा वर्षात खलास
भाजपच्या कमळात
लोजपचा रामविलास

तो क्या हुआआणिबाणी
आयुष्यभर काढली
दुसऱ्यांची उणीदुणी
शेवटी आज उद्भवली
राजदमध्येच आणिबाणी
तो क्या हुआ
नितीश म्हणाले लालूला,
तेरा मेरे साथ है
लालू म्हणाले नितीशला,
अभीभी नौ मेरे हाथ है

जेनेरिक औषधांची माहिती मिळवा


सध्या जेनेरिक औषधांबद्दल, त्यांच्या कमी किंमतीबद्दल बरीच चर्चा होत आहे. डॉक्टर आपल्याला जी औषधे लिहून देतात ती ब्रँडेड असतात. त्यामुळे या औषधांच्या किंमतीही जेनेरिक औषधांच्या पेक्षा अनेक पटीने जास्त असतात. अर्थातच त्यामुळे ही ब्रँडेड औषधे अतिशय महाग पडतात. कमी किंमतीमुळे जेनेरिक औषधे हलकी व जास्त किंमतीमुळे ब्रँडेड औषधे भारी असा एक गैरसमज आहे. पण ब्रँडेड औषधा इतकीच जेनेरिक औषधेही प्रभावी असतात. त्यामुळे त्यांच्या प्रभावीपणाबद्दल आणि उपयुक्ततेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही असे अलिकडेच वृत्तपत्रातून प्रसिध्द झालेल्या लेखातून स्पष्ट करण्यात आले आहे.
ब्रँडेड औषधात असणाऱ्या तशाच कंटेन्टसची पर्यायी जेनेरिक औषधे ही कितीतरी पटीने कमी किंमतीत उपलब्ध होऊ शकतात. पण ही पर्यायी जेनेरिक औषधे कोणती आणि त्याची माहिती कुठे मिळू शकेल? अशी माहिती वेबसाईटवर उपलब्ध होईल, आणि आता तर अशी माहिती आपल्याकडे अँड्रॉईड मोबाईल फोन असेल तर त्यावरही मिळणे सहज शक्य झाले आहे.
यासाठी गुगल प्लेवर विविध अॅप्लीकेशन्स उपलब्ध आहेत. त्यापैकी MyDawaai HKPlus ही दोन अॅप्लीकेशन्स डाऊनलोड करुन घ्यावीत. यातील My Dawaai या अॅप्लीकेशन मध्ये जेनेरिक औषधांची माहिती ऑफलाईन पहाता येते. तर  HK Plus या अॅप्लीकेशनमधून ऑनलाईन माहिती पहाता येते.

या दोन्ही अॅप्लीकेशनद्वारे आपण सर्च केलेल्या ब्रँडेड औषधांच्या किंमती, त्याचे उत्पादक, किंमत किती गोळ्यांसाठी किंवा पातळ औषध असेल तर किती मिलीसाठी या माहितीसह दिसतात. तसेच त्याला पर्याय असणारी औषधेही किंमतीसह (ब्रँडेड किंमतीपेक्षा किती टक्के कमी पटीने) उपलब्ध आहेत हेही आपण पाहू शकतो. HK Plus या ऑनलाईन अॅप्लीकेशनद्वारे तर त्या औषधातील कंटेन्ट चे उपयोग, त्याचे साईड इफेक्टस अशी माहितीही मिळू शकते. 
* * *

अल्टीमेटम लागू


पटेल : नरुभाईला क्लिनचिट, गुप्तभेटीची पेरलेली तीबातमी आणि सर्व पर्याय खुल्लेचा इशारा बरोब्बर जमलं की नाही टायमिंग?
पवार : होय, टायमिंग अचूक जुळलयं खरं. पण त्या महायुतीवाल्यांनी आपल्याला त्यांच्याकडे जागा नाही म्हणून जो गोंधळ घातला,  तो न घालता ते थोडं शांत राहिले असते तर सस्पेन्स अजून वाढला असता.
पटेल : होय त्यांनी शांत रहा आणि पाहाची भूमिका घ्यायला पाहिजे होती खरी, पण नेमकं काय झालं कुणास ठाऊक? माझा सर्व पर्याय खुले आहेतचा बाईट स्क्रीनवर सुरू होता आणि खाली पट्टीमध्ये राष्ट्रवादीला महायुतीत स्थान नाहीची स्ट्रीप पळत होती. सगळाच पचका झाला. बाबा आणि कंपनीच्या पोटात उठणाऱ्या गोळ्याचं परिवर्तन गुदगुल्यात झालं असेल.
पवार : मला ठाऊक आहे ना महायुतीत काय घडलं ते. तेथे फक्त स्वाभिमान आडवा आला, नाहीतर कविवर्य रामदास तर आनंदात तयार होते. आणि बाकीचेही ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे म्हणाले असते.
पटेल : चला कसा का असेना अल्टीमेटम लागू पडला म्हणायचा.
पवार : हो तर, माणिकबाळ बावीस सव्वीसचा डोस प्यायलाच तयार नव्हतं.  गुळण्या करुन बाहेर काढून टाकायचा बेटा. आता डोस कसा गिळतो ते बघावं लागेल. आणि बाबाही पी बाळा काकांच्या हातून एवढा डोस पी बघू माझं शहाणं बाळ ते असं म्हणून आपल्याला डोस पाजायला मदत करतात का ते ही पहावं लागेल.
पटेल : आणि त्यानंतरही डोस प्यायला तयार नसेल तर?
पवार : तर जास्त कडवट लागत असेल असं समजून मग डोस थोडा पातळ करावा लागेल.

* * *

नऊ चे बारा

नऊ चे बारा

युवराज : थँक्यू मोईली अंकल.
मोईली : थँक्यू कशासाठी युवराज?
युवराज : मी नऊच्या ऐवजी बारा म्हटलं आणि तुम्ही ते लगेच जाहीरही करुन टाकलंत म्हणून.
मोईली : त्यात काय मोठं युवराजजी, इटस् माय ड्यूटी.
युवराज : कोणती? लोकसेवेची?
मोईली : छे छे. ती माझी ड्यूटी नाहीच मुळी. तसं असतं तर देशभरातल्या गृहिणी किती दिवसापासून मागणी करताहेत तेव्हाच किंवा विरोधी पक्ष कंठशोष करुन राहिले आहेत तेव्हाच मी नऊ चे बारा मान्य केले असते की.
युवराज : मग आता असं काय घडलंय की तुम्ही नऊचे बारा केलेत अंकलजी?
मोईली : आपली इच्छा आम्हाला शिरसंवाद्य आहे युवराज. तुम्ही तोंडातून शब्द काढायचा अवकाश की आम्ही तो झेललाच म्हणून समजा.
युवराज : हं. हल्ली मलाही तसंच वाटायला लागलयं खरं. कारण मनमोहन अंकलांनीही तो अध्यादेश फाडून केराच्या टोपलीत टाकला असं त्यांच्या ऑफीसमधल्या प्यूनने मला सांगितलं. आणि पृथ्वीराज अंकलनेही तो आदर्शचा फेटाळलेला अहवाल स्विकारला म्हणे. खरंच मोईली अंकल, जसं मी म्हणतो अगदी तसंच कसं काय घडायला लागलंय हे मलाही कळेना.
मोईली : गांधी घराण्याचा करिश्मा आहेच तसा युवराज.
युवराज : मोईली अंकल परवा मी दिलेल्या मुलाखतीमुळे आपल्या पक्षात चैतन्याची लहर आलीय असं मी ऐकतोय खरंय का ते?
मोईली : अगदी खरंय युवराज ते, चैतन्याची इतकी लहर सळसळायला लागलीय की कार्यकर्ते अगदी सैरभैर झालेत कुठे पळू आणि काय करु आणि काय नको अशी भावना त्यांच्यात दिसून यायला लागलीय. (स्वगत : विरोधी पक्षात नाही गेले म्हणजे झालं)
युवराज : पण बरं झालं अंकल तुम्ही नऊचे बारा केलेत ते. मी मागे महाराष्ट्रात गेलो होतो तेव्हा ते एक गाणं ऐकलं होतं त्याची आठवण होतेय बघा, काय होतं ते... हं... मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा
मोईली : (स्वगत : आता आपलेच बारा वाजल्यामुळे जनता आपल्याला घरी जाऊ देईल की काय असं वाटायला लागलयं) खरंय युवराज ते. आता विरोधकांचे बारा वाजलेचं म्हणून समजा. आपल्या पक्षासाठी पूर्ण आयुष्य वेचलेल्या जेष्ठ आणि श्रेष्ठ अशा सर्व पाईकांसाठी पुढची काय आज्ञा आहे ती नेहमीप्रमाणे आम्हाला खाजगीत न सांगता जगजाहिर करावी युवराज. तेवढं पुढच्या वेळीही (स्वगत: आपण सत्तेवर आलोच तर) मंत्रीमंडळात आम्हाला स्थान देण्याचं लक्षात असू द्यावं अशी विनंती आहे युवराज.

* * *

प्रस्थापित पोरखेळवृत्तपत्रे प्रबोधन करतात हे आम्ही ऐकून आणि वाचूनही होतो, पण त्याची प्रचिती आम्हाला कधी आली नव्हती किंवा आम्ही ती घेण्याच्या फंदात पडलो नव्हतो. पण तो योग आज आलाच. त्याला कारणही तसंच घडलं. शुक्रवार दि. 18 ऑक्टोबर 2013 रोजी आम्ही दै. लोकमत मधील प्रस्थापित पोरखेळ नामक अग्रलेखावर नजर टाकली, अन् तत्क्षणीच हा साक्षात्कार आम्हाला झाला. अर्थात आमच्या बालबुध्दीमुळे असा साक्षात्कार व्हायला आमच्या वयाची पन्नाशी उलटावी लागली हा भाग वेगळा, असो.

तर या अग्रलेखातून जनसामान्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आमचा पक्का समज झाला आहे. त्या प्रबोधनातून आम्ही जो काही बोध घेतला आहे, तो आम्ही आपणांपुढे जसाच्या तसा सादर करीत आहोत.

अग्रलेखाचे शीर्षक - प्रस्थापित पोरखेळ

कायद्याच्या कच्याट्यात अडकलेल्या कोणत्याही इसमाने उठावे आणि थेट पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग किंवा काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर दगडफेक करावी हा आपल्या राजकारणातील आताचा प्रस्थापित पोरखेळ आहे.

प्रकाश जावडेकरांसारखी हलकीफुलकी आणि जनाधारहीन माणसे जेव्हा पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, असे म्हणताना दिसतात तेव्हा ती याच पोरखेळाचा पुरावा देत असतात...इत्यादी इत्यादी आणखी बोध घेण्यासारखे बरेच काही

आमच्या बालबुध्दीला झालेला बोध - 1) प्रकाश जावडेकरांसारख्या हलक्या फुलक्या माणसांनी आपली प्रकृती लक्षात घेता पोरखेळ खेळायला जड असे दगड पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग किंवा काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर दगडफेक करण्यासाठी उचलू नयेत. दुसऱ्या भाषेत हलक्याफुलक्या जावडेकरांनी पचायला जड (काँग्रेसला) असं काही उच्चारु नये.

2) केवळ प्रकाश जावडेकरांनीच नव्हे तर काँग्रेसेतर सर्वच पक्षाच्या प्रवक्त्यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग किंवा काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर अशी दगडफेक करण्यापूर्वी आपली प्रकृती हलकीफुलकी आहे की जड, मजबूत, भक्कम आहे, तसेच आपल्याला जनाधार आहे, की फक्त पक्षाचा आधार आहे हे दगडफेक करण्याआधी तपासून घेणे यापुढे अतिशय आवश्यक झाले आहे. ( खरं तर हे अनिवार्य करावं असं आमचं प्रामाणिक मत आहे. पण यातून काँग्रेसच्या प्रवक्त्यांना सूट देण्यात यावी अशीही सूचना आहे.)

या अग्रलेखात आणखीही बोध घेण्याजोगं बरंच काही लिहीलं आहे. पण आमची बालबुध्दी आत्ता तरी यापेक्षा अधिक काही टंकायला नकार देत आहे. तेव्हा तूर्त एवढेच पुरे.

‘वट’ गांधीचा आणि ‘हूकूम’ही गांधींचाच

दोन किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे शिक्षा सुनावलेल्यांची आमदार, खासदारकी रद्द करुन त्यांच्यावर सहा वर्षे निवडणूक लढविण्यास प्रतिबंध करणारा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला केराची टोपली दाखविण्यासाठी  आणण्यात आलेला वादग्रस्त अध्यादेश सरकारने मागे घेतला.

लोकप्रतिनिधीपेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही,  हे सिध्द करण्याचा हा केवढा आटापिटा आणि किती ही तत्परता! घटनेने कायदा बनविण्याचे अधिकार संसदेला दिलेले आहेत. पण या संदर्भात चर्चा करुन कायदा करण्याइतपतही धीर सरकारला निघाला नाही, त्यामुळे तातडीने अध्यादेश काढण्याची गरज सरकारला वाटली.

खरे तर सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालात काहीच चुकीचे नाही अशी सर्वसामान्यांची समजूत. पण जे सर्वसामान्यांना मान्य ते या लोकप्रतिनिधींना मान्य कसे होईल? आणि असे झाले तर मग सर्वसामान्य आणि लोकप्रतिनीधी यांच्यात फरक तो काय राहिला?

तेव्हा मग असे ना का सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, आमच्या सोईसाठी त्यालाही केराची टोपली आम्ही दाखवू शकतो हे दाखवून देण्यासाठी हा अध्यादेश काढून राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. परंतु सर्वसामान्य भारतीयांच्या सुदैवाने जागृत सद् विवेक बुध्दीचे राष्ट्रपती आपल्या राष्ट्राला लाभले आहेत, त्यामुळे या अध्यादेशाला राष्ट्रपती भवनातून लाल कंदील दाखविण्यात आला.

मग अशा परिस्थीती सरकारची होणारी नाचक्की टाळण्यासाठी राहुल गांधीच्या विरोधाचे नाट्य घडवून आणण्यात आले, आणि सरकारची होणारी बेअब्रु टाळण्याचा केविलवाणा आणि हास्यास्पद प्रयोग पार पडला. अध्यादेश मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर रात्री विविध वाहिन्यांवर रंगलेल्या चर्चेत राहुल गांधींचा विरोध म्हणजे जनसामान्यांच्या मताचा आदर होता अशी बाजू मांडण्याची काँग्रेसच्या प्रवक्त्यांची केविलवाणी धडपड सुरू होती.

या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित होतात, मंत्रीमंडळाचा निर्णय अंतिम की राहुल गांधींचा? जनमताचा आदर करण्याची सुबुध्दी लोकपाल, महिलांवरील अत्याचार किंवा त्यासारख्या अनेक संवेदनाशील विषयांत राहुल गांधींना का झाली नाही? नेमकी याचवेळी कशी झाली? राहुल गांधी यांच्या मते हा अध्यादेश नॉनसेन्स आणि फाडून फेकून देण्याच्या लायकीचा होता (आणि सरकारनेही ते मान्य केले) तर मग जे राहुल गांधींना समजले ते मंत्रीमंडळातील जेष्ठ, श्रेष्ठ, राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या मंत्र्यांना कसे समजले नाही? राहुल गांधी यांनी जनमताचा आदर राखला म्हणजेच मंत्रीमंडळाने तो पायदळी तुडविला होता हे तर उघडच आहे, तेव्हा या चुकीबद्दल सरकार सर्वसामान्य जनतेची माफी मागणार आहे का हाच खरा प्रश्न आहे.


* * *