January 2014 | आगळं! वेगळं !!!

नऊ चे बारा

नऊ चे बारा

युवराज : थँक्यू मोईली अंकल.
मोईली : थँक्यू कशासाठी युवराज?
युवराज : मी नऊच्या ऐवजी बारा म्हटलं आणि तुम्ही ते लगेच जाहीरही करुन टाकलंत म्हणून.
मोईली : त्यात काय मोठं युवराजजी, इटस् माय ड्यूटी.
युवराज : कोणती? लोकसेवेची?
मोईली : छे छे. ती माझी ड्यूटी नाहीच मुळी. तसं असतं तर देशभरातल्या गृहिणी किती दिवसापासून मागणी करताहेत तेव्हाच किंवा विरोधी पक्ष कंठशोष करुन राहिले आहेत तेव्हाच मी नऊ चे बारा मान्य केले असते की.
युवराज : मग आता असं काय घडलंय की तुम्ही नऊचे बारा केलेत अंकलजी?
मोईली : आपली इच्छा आम्हाला शिरसंवाद्य आहे युवराज. तुम्ही तोंडातून शब्द काढायचा अवकाश की आम्ही तो झेललाच म्हणून समजा.
युवराज : हं. हल्ली मलाही तसंच वाटायला लागलयं खरं. कारण मनमोहन अंकलांनीही तो अध्यादेश फाडून केराच्या टोपलीत टाकला असं त्यांच्या ऑफीसमधल्या प्यूनने मला सांगितलं. आणि पृथ्वीराज अंकलनेही तो आदर्शचा फेटाळलेला अहवाल स्विकारला म्हणे. खरंच मोईली अंकल, जसं मी म्हणतो अगदी तसंच कसं काय घडायला लागलंय हे मलाही कळेना.
मोईली : गांधी घराण्याचा करिश्मा आहेच तसा युवराज.
युवराज : मोईली अंकल परवा मी दिलेल्या मुलाखतीमुळे आपल्या पक्षात चैतन्याची लहर आलीय असं मी ऐकतोय खरंय का ते?
मोईली : अगदी खरंय युवराज ते, चैतन्याची इतकी लहर सळसळायला लागलीय की कार्यकर्ते अगदी सैरभैर झालेत कुठे पळू आणि काय करु आणि काय नको अशी भावना त्यांच्यात दिसून यायला लागलीय. (स्वगत : विरोधी पक्षात नाही गेले म्हणजे झालं)
युवराज : पण बरं झालं अंकल तुम्ही नऊचे बारा केलेत ते. मी मागे महाराष्ट्रात गेलो होतो तेव्हा ते एक गाणं ऐकलं होतं त्याची आठवण होतेय बघा, काय होतं ते... हं... मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा
मोईली : (स्वगत : आता आपलेच बारा वाजल्यामुळे जनता आपल्याला घरी जाऊ देईल की काय असं वाटायला लागलयं) खरंय युवराज ते. आता विरोधकांचे बारा वाजलेचं म्हणून समजा. आपल्या पक्षासाठी पूर्ण आयुष्य वेचलेल्या जेष्ठ आणि श्रेष्ठ अशा सर्व पाईकांसाठी पुढची काय आज्ञा आहे ती नेहमीप्रमाणे आम्हाला खाजगीत न सांगता जगजाहिर करावी युवराज. तेवढं पुढच्या वेळीही (स्वगत: आपण सत्तेवर आलोच तर) मंत्रीमंडळात आम्हाला स्थान देण्याचं लक्षात असू द्यावं अशी विनंती आहे युवराज.

* * *