रामदेवाबांचे आंदोलन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून | आगळं! वेगळं !!!

रामदेवाबांचे आंदोलन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून

लोकशाहीचा खून

अखेर रामदेवबाबांना अटक करून त्यांचे आंदोलन चिरडण्यात सरकार यशस्वी झाले. लोकशाहीचा उदोउदो करणाऱ्या कोंग्रेस सरकारला लोकशाहीचाच खून पाडण्याचे आदेश देताना जराही लाज वाटली नाही. मध्यरात्री उशिरा सगळा देश आणि मिडिया झोपेत असताना दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच दिल्ली पोलिसांनी ही कारवाई स्वतः केली असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. बराच खल करून अशी कारवाई करण्याचे आदेश पंतप्रधान मनमोहनसिंग व कोंग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले होते असा विरोधकांचा आरोप आहे.


मिडीयाला दिला चकवा

रामदेवबाबांना हेलीकॉप्टरने हरिद्वारला रवाना करण्यात येणार असल्याच्या 'गुप्त' बातम्या फक्त तुम्हाला म्हणून सांगतो या आविर्भावात मीडियामध्ये पेरून मिडियावाल्यांना आणि रामदेवाबांच्या समर्थकांना चकवा देवून त्यांना डेहराडूनला रवाना करण्यात पोलीस यशस्वी ठरले. पोखरण येथे भारताने भूमिगत अणुस्फोट केला होता त्यावेळी अमेरिकेच्या टेहाळणी उपग्रहांना चकवा देण्यासाठी देशाच्या सीमावर्ती भागात सैन्याच्या हालचाली सुरु ठेवल्या होत्या, आणि 'बुद्धा हॅज स्माइल्ड' हे ऑपरेशन यशस्वी केले होते, याची याठिकाणी आठवण झाल्याशिवाय रहात नाही. पण दिल्ली पोलिसांनी या ऑपरेशनला 'मनमोहन हॅज स्माइल्ड' की 'गॉंडमदर हॅज स्माइल्ड' असे कोणते नाव दिले होते ते मात्र कळू शकले नाही.

रामदेवबाबांचे फॅन्सी आंदोलन

रामदेवबाबांचे हे आंदोलन सरकारला झुकविण्यासाठी होते का देशाला भपका दाखविण्यासाठी होते असा प्रश्न पडावा इतका भपका मिडीयाच्या माध्यमातून देशवासीयांना बघायला मिळाला. रामदेवबाबांच्या या आंदोलनात कुठेही साधेपणा बिलकुलसुद्धा दिसून आला नाही. रामलीला मैदानावर या आंदोलनासाठी त्यांनी वॉटरप्रूफ पंडाल (मंडप), शेकडो पंखे, कुलर्स, पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, इत्यादी प्रकारची जी काही नियोजनबद्ध व्यवस्था केली होती, ती पाहून कुणीही थक्क झाले नसते तरच नवल. त्यांना हेच आंदोलन साधेपणाने हरिद्वार येथेच पतंजली योगापिठातही करता आले असते. आता इतका खर्च रामलीला मैदानावर आधीच केला असल्यामुळे, त्यांच्या जवळपास बहुतांशी मागण्या मान्य केल्या आहेत असे सरकारकडून सांगण्यात येत होते, तरीही त्यांना झालेल्या खर्चाचा 'पैसा वसूल' साठी आंदोलन करणे अपरिहार्य ठरले होते असे म्हणायला हरकत नाही.

दिग्गीराजांना आवरणारे नाही कुणी

या सर्व घटनेवर कॉंग्रेसच्या बचावाची लढाई नेहमीप्रमाणे अर्थातच कॉंग्रेसचे 'साक्षात्कारी' सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनीच लढविली. त्यांना 'साक्षात्कारी' म्हणण्याचे कारण असे की, परिस्थिती पाहून त्यांना सोयीनुसार बरेच 'साक्षात्कार' वेळोवेळी होत असतात. विशेषतः कॉंग्रेसशी कुणी 'पंगा' घेतला की, त्या व्यक्तीच्या संपत्तीची चौकशी करण्याची करण्याची त्यांची मागणी तर आता संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाली आहे. जोपर्यंत कॉंग्रेसला एखाद्या व्यक्तीचा विरोध नसतो, तोपर्यंत त्या व्यक्तीच्या कितीही अमाप संपत्तीकडे दिग्गीराजा पूर्णपणे दुर्लक्ष करतात थोडक्यात त्याला माफ करतात. लेकिन जो कोंग्रेससे पंगा लेगा, दिग्गीराजा उसे बिलकुल नहीं बक्षेंगे. पण अशी संपत्तीच्या चौकशीची मागणी दिग्विजयसिंह यांनी कोणत्याही कॉंग्रेसच्या अथवा त्यांच्या सरकारमध्ये सामील असलेल्या नेत्यांच्या बाबत केल्याचे एकही उदाहरण नाही.

रामदेवबाबांनी कायद्याचा भंग केला त्यामुळे पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच होती, असे समर्थनही करायला ते विसरले नाहीत. शनिवारी पहाटेपासून सुरु झालेल्या उपोषणाने संपूर्ण दिवसभरात कायद्याचा भंग झाला नाही, मात्र मध्यरात्री उशिरा कायदा कसा भंग झाला याचे स्पष्टीकरण मात्र त्यांनी द्यायला पाहिजे होते ते काही दिले नाही.

आंदोलन चिरडल्यानंतरचे राजकारण

हे आंदोलन चिरडले गेल्यानंतर आता भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी या निमित्ताने तापलेल्या तव्यावर आपल्या पोळ्या भाजून घ्यायला सुरुवात केली आहे. सरकारवर निशाना साधायला बंदूक ठेवण्यासाठी रामदेवबाबांचा खांदा त्यांना आयताच मिळाला आहे. बाबा इतरांना काढा देत असले तरी हे त्या काढ्याचाही अर्क आहेत. तेव्हा ही सुवर्णसंधी ते कसे सोडतील?

मतभेद लपले नाहीत

यानिमित्ताने अण्णा हजारे, स्वामी अग्निवेश यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांचे रामदेवबाबाशी असलेले मतभेदही लपून राहिले नाहीत. त्यांची आपसातील धुसपूस मीडियातून लोकासमोर आलीच आहे.

0 Comments:

Post a Comment