ब्लॉगचा पेज लोड स्पीड कसा वाढवाल? | आगळं! वेगळं !!!

ब्लॉगचा पेज लोड स्पीड कसा वाढवाल?

आपल्या ब्लॉगचे पेज लोड होण्यास लागणाऱ्या वेळेकडे आणि वेगाकडे आपण कधीतरी लक्ष दिले आहे का? नसल्यास या गोष्टीकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ही दुर्लक्षिली जाणारी गोष्टच वाचकांवर बरा किंवा वाईट प्रभाव टाकत असते.


इंटरनेटमध्ये सध्या जरी 3G आणि Broadband चा जमाना असला तरीही, आजही पुष्कळ लोक Dialup व GPRS द्वारे इंटरनेट वापरतात हे विसरून चालणार नाही. Dialup व GPRS चा वेग मुळातच अतिशय मंद असल्याने, याद्वारे इंटरनेट वापरणाऱ्यांच्या पीसीवर कोणतीही वेबसाईट लोड होण्यास बराच अवधी लागत असतो. आणि नेमकी हीच गोष्ट त्यांच्या दृष्टीने कंटाळवाणी असते. त्यामुळे हेच काय, परंतु सर्वच वाचक पटकन लोड होणाऱ्या साईटसना प्रथम पसंती देतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

पेज लोडिंग स्पीडबद्दलच्या तांत्रिक बाबींच्या खोलात न जाता, सर्वांना जमेल अशा काही साध्या गोष्टीकडे लक्ष देऊन आपण पेज लोड होण्याचा वेग वाढवू शकतो. त्यासाठी काही टिप्स अशा:

१. अनावश्यक मोठया वेब ग्राफिक्सचा उपयोग टाळा.

२. अगदीच गरज असल्याशिवाय अनिमेशन्सचा वापर करु नका.

३. ब्लॉग आकर्षक दिसावा म्हणून केलेल्या फॅन्सी कलर स्कीम्स व फोटोग्राफ्सचा वापर टाळायला हवा.

४. लोड होण्यास वेळ लागणाऱ्या टेम्प्लेट ऐवजी जलदगतीने लोड होणारी सिंपल टेम्प्लेट वापरा.

५. लोड होण्यास जास्त वेळ लागतील असे हेवी ग्राफिक्स ब्लॉगच्या हेडरसाठी वापरु नका.

६. अनेक ब्लॉग्जची लांबी इतकी मोठी  ठेवलेली असते की, जसे पाण्यात उडी मारल्यानंतर लवकर तळ दिसत नाही, त्याचप्रमाणे काही ब्लॉगवर कितीही स्क्रोलिंग केले तरी,  त्या ब्लॉगचे फूटर काही लवकर दिसत नाही. असे लांबलचक ब्लॉग लोड व्हायला अर्थातच भरपूर वेळ लागतो. तेव्हा ब्लॉगची लांबी किमान ठेवा, म्हणजे साधारणतः जास्तीतजास्त 'पाच' पोस्टस् होमपेजवर ठेवा. त्याही संपूर्ण नकोत, तर  Jump Break (Read More) या सुविधेचा वापर करून त्यांची लांबी कमी करुन ठेवा.

६. आणखीन एक अतिशय महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, सर्वच ब्लॉगधारकामध्ये घड्याळ, कॅलेंडर्स, विविध देशांची चलने, गेम्स, ऑडीओ-व्हिडिओ प्लगइन्स, विविध प्रकारची व्हिजिटर काऊंटर्स, सर्च बॉक्स ही यादीसुद्धा लवकर संपणार नाही; इतक्या एक ना अनेक प्रकारची भरमसाठ अनावश्यक विजेटस् लावण्याची स्पर्धा दिसून येते. ही सर्व अनावश्यक विजेटस् पेज लोड टाईम वाढवितात हे लक्षात घ्यावे. म्हणून अगदीच गरजेची असतील तेवढीच विजेटस् ठेवा आणि बाकीची कोणताही मोह न ठेवता काढून टाका.

शेवटी इतकेच सांगता येईल की, वरील सर्व गोष्टींनी ब्लॉगची सजावट करून वाचकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, त्यांना उत्कृष्ट व दर्जेदार मजकूर देऊन आकृष्ट करण्याचा प्रयत्न केलात तर, वाचक आपोआपच आपल्या ब्लॉगला नियमितपणे भेट देत राहतील यात शंकाच नाही.

याप्रकारे साध्या व सोप्या सूचनांचे पालन करून आपल्या ब्लॉगचा पेज लोडिंग स्पीड वाढविण्याचा प्रयत्न करता येईल.

या सूचना आपल्याला उपुयक्त वाटल्या का? याविषयी आपले अभिप्राय अवश्य द्या.

1 Comments: